तुम्ही विचार करणार फोटो गणपतीचा आणि विषय नारी सर्व शक्ती....!!!
विषय आहेच तसा, म्हणून लिहावंसं वाटलं. करोनामुळे आपल्या सर्वांवर एक अघडीत संकट आले होते. आजही सर्व जग ह्या संकटाशी लढत आहे. सुरवातीच्या काळात सर्व जण घरी बसले. ज्यांना घरून काम करणे शक्य होते त्यांनी घरून काम केले आणि ज्यांना शक्य नव्हते त्यांना नोकरी सोडावी लागली. तरीही लोक तग धरून आहेत. आज ना उद्या सर्व काही ठीक होईल.
तर विषय असा आहे की माणूस जगणे सोडू शकतो पण काही गोष्टी नाही सोडू शकत. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्याच प्रकारे आपण भारतीय लोक सणांच्या बाबतींत खूप उत्साही आहोत. गणपती उत्सव साऱ्या भारतात सर्व जण उत्साहाने साजरा करतात. मुंबई मध्ये तर गणपती उत्सव म्हणजे जीव की प्राण. मागच्या वर्षी सर्वानी करोनाचं संकट लक्षात घेऊन घरच्या घरिच बाप्पा चा उत्सव साजरा केला हे लक्षणीय होते.
मी कामामुळे दुबईला असतो आणि गणपति काळात वडील lockdown मुळे गावाला अडकले होते. त्या नंतर आम्हीच वडिलांना समजावले की बदलापूर मध्ये करोना खूप वाढलाय. तुम्ही गावालाचं थांबा. त्यामुळे माझ्या छोट्या बहिणीने गणपती बसवायची तयारी स्वतः करण्याचा विडा उचलला.
मागच्यावर्षी प्रमाणेच ह्या वर्षी सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून घरीच काळ्या मातीची मूर्ती बनवण्याचा संकल्प माझ्या मोठ्या ताईने आणि भाऊजींनी घेतला. मोठ्या बहिणीच्या पाऊलांवर पाऊल ठेवत माझ्या छोट्या बहिणीने कल्याणीने सुद्धा पर्यावरण आणि करोना मुळे घरच्या घरीच मूर्ती बनवण्याचा संकल्प केला. सुरवातीला मला थोडी काळजी वाटली. मी इकडे, वडील गावाला, आई घरच्या कामामध्ये व्यस्त आणि स्वतः बहीण सुद्धा कामात सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत कंपनी चा लॅपटॉप घेऊन बसते. तिला कळून चुकले की जेवढे सोपे वाटतेय तेवढे सोपे काम नाही हे. तरीही तिने ही जबाबदारी स्वीकारली. तिने मग सुरवात केली. सुरवातीच्या काळात तिला खूप त्रास झाला. मातीचा साचा नसतांना मूर्ती तयार करणे म्हणजे खरंच कलाकुसरीचे काम आहे खूप. त्या दिवशी तिला एका शिल्पकाराने महत्व समजले. ती तिचे दररोज चे अनुभव मला समजावून सांगत होती. दिवसभर ऑफिस चे काम संपवून तो रात्री मूर्ती बनवण्यात व्यस्त असायची. असेच करत करत दहा दिवस गेले. बाप्पाची मूर्ती आकार घेत होती. असेच एके दिवशी तिला ताप आला. ऑफिस चे आणि बाप्पा चे दोघांचे काम रखडले. ताई आणि भाऊजी तिला अधून मधून मदत करत होते. पण हाती घेतलेले काम जो पर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला रात्री झोप येत नाही. तिला खूप टेन्शन आले. कारण मागच्या वर्षी ह्याच वेळेस बाप्पा बसायची वेळ आणि ती स्वतः मलेरिया मुळे दवाखान्यात दाखल व्हायची वेळ एकाच होती. तिला वाटले बाप्पा माझ्या सोबतच असे का करतो. त्या दिवशी ती माझ्या सोबत फोन वर खूप रडली. दादा आई आजारी आहे मी पण आजारी आहे. ताई च्या घरी पण थोड्या फार प्रमाणात सर्व जण आजारी आहेत. कसं होईल रे सर्व. मग मी तिला धीर दिला. तू खूप मेहनत घेतली आहेस. मूर्ती पूर्ण नाही झाली तरीही काही होत नाही. जशी असेल तशी तू स्थापना कर. ती म्हणाली की दादा अजून रंग पण नाही दिले आहेत. मी तिला अजून धीर देण्याचा प्रयत्न केला. तुझी खुप मेहनत आहे त्यात. रंग असले काय किंवा नसले काय फरक पडणार आहे. फक्त मनाभावाने पूजा कर. देव भावेचा भुकेला आहे. ती हो म्हणाली आणि तिने फोन ठेवला.
मला वाटले ती झोपली असेल पण दुसऱ्या दिवशी आई ने मला सांगितले की त्या रात्री पण तिने ताप असतांना सुद्धा मूर्ती चे काम करत बसली होती. दुसऱ्या दिवशी खूप जास्त आजारी असल्यामुळे तिने ऑफिस ला सुट्टी टाकली होती. तापावरील गोळ्या दररोज खाणे चालू होत्या पण फक्त माझ्या आग्रहास्तव ती परत एकदा सकाळी दवाखान्यात गेली. रक्त वैगरे चेक केले. रिपोर्ट्स सर्व ठीक आले. ती आता ठीक होती.
त्या दिवशी तिने परत एकदा जोमाने काम चालू केले. गणपती बाप्पा विराजमान होण्यास फक्त एकच दिवस बाकी होता. सर्व काही सुरळीत होताच होते तेवढ्यात परत एकदा बाप्पा तिची परीक्षा घेण्यास तयार झाला. ह्या वेळेस आई ला खूप ताप आला. त्या रात्री आई तापाने फणफणली होती. त्या दिवशी तिने थोडेफार ऑफिस चे काम करून नंतर घरचे सर्व काम केले आणि परत एकदा गणपती बाप्पा ची मूर्ती तयार करण्यास बसली. ती हरणाऱ्यांमधली नव्हती हे देवाला ही कदाचित चांगलेच माहीत असावे. देव परीक्षा नेहमी त्यांचीच घेतो ज्यांच्या मध्ये खडकांवर असलेल्या काट्यांमधून चालण्याची हिम्मत असते. शेवटी कठीण परिस्तिथी समोर तिचे प्रयत्न जिंकले. बाप्पाच्या मूर्तीला सुरेख असा आकार आला. तसाही देव पण तेच सांगतो, तुम्ही प्रयत्न करा. मी तुमच्या सोबत नेहमीच राहील. तिला या कामामध्ये मोठी ताई, भाऊजी आणि आई या सर्वांनी मोलाची मदत केली. सर्वांचे ही खूप कौतुक.
सांगायचं तात्पर्य एवढेच की एक स्त्री ही सर्व गोष्टींमध्ये खुप श्रेष्ठ असते. शारीरिक दृष्ट्या कदाचित ती पुरुषपेक्षा कमकुवत असेल पण बाकी सर्व गोष्टींमध्ये ती पुरुषपेक्षा सरस आहे. कुठल्या ही संकटाला ती न घाबरत पुढे जाते. इतर वेळेस साधी दिसणारी ती जेव्हा घरावर संकट येते त्या वेळेस ती माँ दुर्गा चे रूप घेते आणि संकट परतवून लावते. ती आई सारखी मेहनती आहे, ती बहिणी सारखी मायाळू आहे, ती बायकोच्या रुपात जीवनसंगणी आहे, मुलीच्या रुपात कल्याणकारी आहे. अश्या या नरी रुपी शक्तीला माझा नमस्कार.
सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.