Showing posts with label राजगड. Show all posts
Showing posts with label राजगड. Show all posts

Thursday, August 23, 2018

राजगडावरील अविस्मरणीय दोन दिवस

     जगाच्या पाठीवर काही थोर महापुरुषांचा इतिहास हा समोरच्याला जाऊन सांगावा लागत नाही. तो वाऱ्याच्या वेगाने आपोआप पसराला जातो. अश्याच काही महापुरुषांमध्ये एक आपले महाराज. म्हणजेच अख्या महाराष्ट्राचे आद्य दैवत आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. किती शौर्य सांगावे महाराजांचे...!!! चारही बाजूने परकीय सत्ता होती. तेव्हा पराक्रमी शहाजीराजे आणि शूर अश्या जिजाऊंना शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये एक अनमोल असे महारत्न लाभले. आणि त्या नंतर हिंदवी स्वराज्याचे वारे सगळीकडे वाहू लागले. रायरेश्वराच्या मंदिरात सवंगड्यानसोबत घेतलेली प्रतिज्ञा महाराजांनी तोरणाच्या रूपाने पूर्ण करण्यास सुरुवात केली. त्या नंतर महाराजांनी कधीच मागे वळून बघितले नाही. महाराजांनी जिंकलेल्या सर्व लढाया आणि किल्ले या सर्वांच्या गोष्टी खूपच रंजक आहे. पण त्या सर्वांमध्ये स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ल्याचा इतिहास खूपच छान आहे. राजगडावर गेल्याशिवाय कोणालाच कळू शकत नाही की महाराजांनी ह्या किल्याला एवढे प्राधान्य देऊन राजधानी का म्हणून घोषित केली असेल. पराक्रमी असण्याखेरीज महाराज बुद्धीने खूप तल्लख होते. भविष्यात कुठल्या बाजूने आक्रमण होऊ शकते हे त्यांना बरोबर ठाऊक होते. म्हणूनच महाराजांनी राजगड निवडला. राजगडाच्या सर्व बाजूने दुर्गम असा डोंगराळ भाग आहे. राजगडाच्या आजू बाजूला असणाऱ्या उंच अश्या कड्या कपाऱ्या, घनदाट जंगल आणि जंगलातील भयानक प्राणी या सर्वांमुळे शत्रू इकडे येण्याच्या प्रश्नच उभा राहत नव्हता. सुरवातीस राजगडाला मुरुंबदेवाचा डोंगर म्हणत असत. महाराजांनी डोंगर काबीज करून डागडुजी केली, भक्कम अशी तटबंदी केली. त्यावर पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा अश्या तीन माच्या आणि बालेकिल्ला बांधला. त्यानंतर महाराजांनी त्यास राजगड नाव देऊन मराठा स्वराज्याची राजधानी घोषित केले.
       अश्या ह्या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आमच्या सारखे इतिहासप्रेमी नेहमीच उत्सूक असतात. आम्ही सर्व मित्रांनी ह्या किल्ल्याला भेट द्यायची ठरवली. मग आमच्या शाळेतील काही निवडक मुलांनी एक आराखडा तयार केला. दहा- बारा मुले येण्यासाठी तयार झाली.  #Whatsapp चा ग्रुप तयार करण्यात आला. आमच्या शाळेतील समाधान याने या मोहिमेची जबाबदारी स्वीकारली. मग त्याने सगळ्यांना कामे दिली. राहुल कोंढाळकरला रात्रीच्या जेवणाची सोय, अजितला किल्यापर्यंत जाण्यासाठी चार चाकी गाडी, वैभव आणि सुरज यांना बाकीच्या मुलांना फोन करून राजगड मोहिमेची माहिती देण्याची, प्रफुलला सकाळच्या न्याहारची आणि सोबत भगवा झेंडा घेणायची जबाबदारी देण्यात आली. रस्त्याने महाराजांचा पोवाडा लावण्यासाठी बलुटूथ स्पीकर आणायची जबाबदारी राहुल तांगडेला देण्यात आली. समाधान ने गडाचे आणि आमचे फोटो फोटो काढण्यासाठी DSLR आणायची जबाबदारी घेतली. माझ्यासारखे जे मुले कामाचे बहाणे देत येण्याचे टाळतात त्यांना येण्यासाठी तयार करण्याचे काम उमेशला देण्यात आले. आणि सर्वात शेवटी मी (अतिश) लांबून येणार असल्यामुळे सकाळी 5 ची लोकल पकडून येण्यासाठी मला सांगण्यात आले. लोकल हुकली असती तर जाण्यासाठी उशीर झाला असता. तसे समाधान ने मला राजगड मोहीम संपल्यावर अजून एक काम दिले. ते मी सर्वात शेवटी सांगणार आहे. कारण काम सर्वात शेवटी दिले ना. बरे असो महत्वाच्या दिवसाबद्दल बोलूयात. आम्ही नऊ जण राजगड च्या भेटी साठी तयार झालो. समाधान कडून आधल्या रात्री #Whatsapp वर सगळ्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. कल्याण स्टेशन वर 5.30 ला भेटण्याचे ठरले. नऊ पैकी पाच जण आंबिवली वरून गाडी घेऊन कल्याण स्टेशन वर येणार होते. आणि उरलेले आम्ही चार जण त्यांना कल्याण स्टेशन वर भेटणार होतो. मी बदलापूर वरून, राहुल तांगडे ठाणे वरून, उमेश खडवली वरून आणि समाधान टिटवाळा वरून सकाळीच निघालो. साधारणतः आम्ही चारही जण साडेपाच पर्यंत कल्याण स्टेशन वर पोहचलो. मग आम्ही इतर पाच जणांना फोन लावून विचारले तर एकानेही फोन उचलला नाही. मग पाच मिनीटांनी वैभव चा फोन आला. त्याने सांगितले अजून कोणीच भेटले नाहीत. मग राहुल कोंढाळकरला फोन केल्यावर कळले की अजित ची गाडी अजून चालू झाली नाही आहे. प्रफुल्ल फोन उचलत नाही आहे. सुरज अजुनपण झोपेतच आहे. अरे किती गडबड ह्या सर्वांची. आम्हाला कळून चुकले की त्यांना येण्यास उशीर होणार आहे. मग आम्ही कल्याण स्टेशनच्या बाहेर इडली-वड्यांचा भरपेट नास्ता केला. त्या नंतर  मस्त पैकी गरमागरम चहा घेतला. साधारणतः एक तास थांबल्यावर उरलेले सर्व जण गाडी घेऊन कल्याण स्टेशन वर पोहचले. गाडीत बघितले तेव्हा चार जण दिसले. एक जण गायब होता. अरे झेंडा आणणारा प्रफुल्ल कुठे दिसत नव्हता. मग कळले की तो आलाच नाही. त्याचे काका आजारी होते. अश्या प्रकारे आम्ही नऊ पैकी आठ जण जाण्यासाठी तयार झालो. राजगडला जाण्यासाठी आम्ही कल्याण-कर्जत-पुणे-गुंजवणे फाटा हा मार्ग निवडला. राजगडावर जाण्यासाठी 3 रस्ते आहेत. गुंजवणे वरून, पाली वरून आणि भोर वरून. पाली वरून जाणार रस्ता हा राजमार्ग असल्यामुळे तो सोपा आहे. भोर च्या मार्गाची जास्त कोणालाही कल्पना नव्हती. म्हणून आम्ही गुंजवणे फाटा वरून जाण्याचा निर्णय घेतला. हा एक चोर मार्ग असल्यामुळे बाकीच्या मार्गांपेक्षा कठीण आहे. रस्त्याने गाडीत असताना आम्ही सर्व मित्र शाळेतील गप्पा गोष्टी आठवून हसत होतो. शाळेतील सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. पुणे गुंजवणे च्या मध्ये राहुल कोंढाळकर च्या वडिलांचे दुकान लागते. त्याच्या वडिलांनी आम्हाला सर्वाना रात्री साठी सतरंजी, पाणी बॉटल्स आणि खाण्या पिण्याच्या गोष्टी आणून दिल्या. दुपारच्या दोनवाजेपर्यंत आम्ही सर्व जण गडाच्या पायथ्याशी पोहचलो. वैभवने तिथल्या एक हॉटेल मालकाला रात्रीच्या जेवणाची सोय करायला सांगितली. हॉटेल मालकाने सांगितले की रात्री सात-आठ पर्यंत तुमचे जेवण गडावर पोहचून जाईल. वैभवने हॉटेल मालकाला पैसे दिले आणि त्याचा मोबाइलला नंबर घेतला. रात्री झोपण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी लागणारे सामान आम्ही आमच्या बॅगांमध्ये भरले व उरलेले अनावश्यक सामान गाडी मधेच ठेवले. अंदाजे दुपारच्या तीन वाजता आम्ही सर्व जण थोडे फार काहीतरी खाऊन गड चढायला सुरुवात केली. त्यांनतर सुरु झाला आमचा रोमांचकारी प्रवास.
       भरपूर पाऊस पडत असल्यामुळे पूर्ण रस्त्याने चिखल होता. सकाळी गडावर गेलेलं लोक घाबरून परत फिरत होते. आम्हाला कोणी काही म्हणाले नाही. पावसामुळे ते सर्व जण भिजलेले होते. त्यांचे कपडे आणि बॅगा चिखलाने भिजलेले होते. त्यांची ती अवस्था बघून पुढचा रस्ता कठीण आहे हे जाणवत होते. तरीही आम्ही सर्व जण शिवाजी महाराजांचे आणि आई भवानीचे नाव घेत पुढे चालत राहिलो. काही अंतरावर गेल्यावर आम्हाला काही परदेशातील लोक मिळाले. मग आम्ही त्यांना विचारले की तुम्ही कुठून आला आहात. त्यांनी सांगितले की ते सर्व बेलजीयम देशातून आलेले आहेत. ह्या गोष्टीमधून एक जाणवते की महाराजांची आणि किल्यांची ख्वाती जगभर पसरलेली आहे. मग आम्ही चालता चालता राहुल तांगडेच्या बॅगेतील काळे खजूर खाल्ले. मग एका सुंदरश्या जागेवर थांबून सुरज ने त्याचा फेसबुक च्या कव्हर पेज वर ठेवण्यासाठी फोटो काढायला सांगितला. पहिल्यांदा फोटो काढण्यासाठी जास्त कोणी उत्सुक नव्हते. पण वैभवने जसा बॅगेतुन समाधानाचा चा DSLR काढला तसे आम्ही सर्व जण फोटो काढण्यासाठी समाधानच्या पाठी लागलो. मग सुमारे अर्धा तास फोटोशूट करून झाल्यावर आम्ही परत गडाकडे मार्गक्रमण करत निघालो. रस्त्याने आम्हाला बऱ्याच छोट्या छोट्या कड्याकपाऱ्या लागल्या. तश्या त्या खूप कठीण होत्या पण पर्यटन विकास किंवा गडस्वरक्षक च्या लोकांनी जागोजागी वर चढताना हाताला आधार म्हणून लोखंडी सळ्या लावल्या आहेत. मजल दरमजल करत आम्ही सर्व जण संध्याकाळी सहा वाजता पद्मावती माचीवर पोहचलो. पद्मावती माचीवर पद्मावती मातेचं मंदिर आहे. मंदिराच्या समोरच सईबाईंची समाधी आहे. समाधीचे आणि मातेचे दर्शन घेऊन लगेच आम्ही सर्व जण मंदिरात बसलो. आम्ही बॅगेतून उरलेल्या वस्तू काढून खाण्यास सुरवात केली. का माहीत पण वेगळीच मज्जा आली मंदिरात. थोडा वेळ आराम करत आम्ही सर्वानी मंदिरात खाण्यापिण्याची सोय करणाऱ्या दादाला इतर स्थळांची माहिती विचारली. त्यांनी आम्हास सांगितले की पूर्ण गड फिरण्यास दोन दिवस पण कमी पडतात त्यामुळे तुम्ही योग्य नियोजन करा. पद्मावती माचीवरून सरळ डोंगरावरून जाणारा रस्ता संजीवनी माचीवर जातो, उजवीकडे जाणारा रस्ता पाली दरवाजाकडे जातो व डावीकडे जाणारा रस्ता सुवेळा माचीकडे जातो. बालेकिल्ला हा संजीवनी माचीकडे जाताना मध्ये लागतो. हे सर्व ऐकून आम्ही सर्व जण शांत बसलो. एका गडावरील सगळे ठिकाण वेगळ्या दिशेला. अरे बापरे भरपूर वेळ जाणार होता. संध्याकाळचे सहा वाजले असल्यामुळे आम्ही फक्त संजीवनी माची वर जाण्याचे ठरवले व दुसर्‍या दिवशी इतर ठिकाणी जायचे ठरले. संजीवनी माचीकडे मार्गक्रमण करत असतांना पद्मावती मंदिरापासून जवळच एक सदर मिळाली. सदर म्हणजे किल्ल्याचे कागदपत्र कामकाज सांभाळणारे कार्यालय. राजगडावरची सदर भरपूर भक्कम अश्या दगडांनी बांधलेली आहे. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कि  महाराजांनी त्या काळात सुध्दा प्रशासनाच्या कामाला किती महत्व दिले होते. सदर बघून पुढे जात असतांना आम्हाला अजून एक रस्ता मिळाला. आम्ही थोडे विचारात पडलो कि कोणत्या रस्त्याने जायचंय. त्यातील एक मार्ग निवडून आम्ही पुढे जायला निघालो. तेवढ्यात सुरज म्हणाला कि आपण चुकीचा मार्ग निवडलाय. पण त्याचे कोणीही ऐकले नाही. आम्ही निवडलेला मार्ग खरेच चुकीचा होता. पण आम्हाला ते नंतर कळाले. कारण आम्ही संजीवनी माचीच्या जागी पाली दरवाज्याकडे पोहचलो होतो. गडावरून खाली उतरायला चांगला असा दगडी रस्ता बनवलेला आहे. हाच तो पाली दरवाज्यातून जाणारा राजमार्ग.  पाली दरवाजाकडे जातांना आम्ही सर्वजण पूर्णतः भिजलो होतो आणि त्यातल्या त्यात भर म्हणजे संध्याकाळचे सात वाजले होते. आम्हाला सर्वांना खूपच जास्त थंडी वाजायला लागली होती. थोडावेळ आडोशाला थांबून आम्ही सर्वजण पद्मावती मंदिरात पोहोचलो. रात्रीचे आठ वाजले होते. आम्ही सर्वांनी बॅगेतुन आणलेले सुके कपडे घातले आणि जेवायला बसलो. त्या रात्री आषाढ अमावस्या असल्यामुळे भयंकर अंधार होता. मंदिराच्या पत्र्यांवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनी तिथली भयाण अशी शांतता भंग पावत होती. पण मंदिरात असलेली देवाची आणि महाराजांची मूर्ती मनाला एक वेगळाच आधार देत होती. देवीसमोर लावण्यात आलेला तो तेजस्वी दिवा मनाला आतून ऊब देत होता. मग आम्ही सर्वांनी त्या स्वादिष्ट जेवणाचा उपभोग घेतला. त्यांनतर आम्ही झोपण्याची तयारी चालू केली. मंदिराची फरशी फारच थंडगार असल्यामुळे त्या दादाने आम्हाला त्यांच्याकडची प्लास्टिकचे कापड दिले. सर्व जणांनी ते कापड आणि आमच्या जवळच्या सतरंजी अंथरून एकमेकांना चिटकून झोपी जाण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्यातील दोघातिघांनी अंगावर अंथरायला चादर आणली नसल्यामुळे आम्ही दोघांमध्ये एक अंगावर घेण्याचे ठरवले. आम्हाला त्या शांततेत झोप लागणारच होती तेवढ्यात कसला तरी आवाज आला. खूपच भयानक होता तो आवाज.  थोडयाश्या शांततेने परत एकदा आवाज आला तेव्हा कळले की आमच्या बाजूला कर्नाटकच्या चार जणांचा एक गट झोपला होता. आणि त्यातील एक जण खुप जोरजोरात घोरत होता. आम्हाला खूप हसायला आलं. त्या माणसाचे घोरणे आता थांबेल किंवा तेव्हा थांबेल या विचारात असतानाच त्याचा घोरण्याचा आवाज जास्तच येऊ लागला. तो जेवढ्या जोरात घोरायचा तेवढ्या जोरात आम्ही सर्व जण हसायचो. एक छान लय जमली त्याच्यात आणि आमच्यात. जेव्हा तो आवाज जास्तच त्रासदायक झाला तेव्हा मग सुरजने त्या माणसाला थोडेशे जागे केले. जागे झाल्यावर त्या माणसाचे घोरणे बंद झाले. मग आम्ही आठ जण झोपनार तेवढ्यात आमच्या मधील एकाने घोरण्यास सुरवात केली. अरेरे अजूनच भयानक आवाज येण्यास सुरुवात झाली आहे. मी त्या व्यक्तीचे नाव सांगणार नाही. कारण माझा तो मित्र मला घरी येऊन मारेल. खूपच जास्त थंडी वाजत असल्याने एवढ्या आवाजात पण आम्ही सर्व जण एकमेकांना चिटकून झोपी गेलो.
       दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व जण पहाटे लवकर उठलो. प्रातःविधी उरकून आम्ही चहा पिण्यासाठी बसणार तेवढ्यात एका दुसऱ्या गटाच्या मुलाने मंदिरात जोरात एक घोषणा केली कि माकडे आलेली. कोणाचा तरी नारंगी रंगाचा आदिदास चा एक बूट घेऊन गेली आहेत. सुरवातीस आम्हाला काही वाटले नाही मग कळले कि राहुलचा बूट माकडे पळवून घेऊन गेलीत. आम्ही आठही जण काठ्या घेऊन राहुलचा एक बूट शोधण्यासाठी मंदिराच्या बाहेर पडलो. माकडांच्या जवळ गेले कि ते आम्हाला बघून घाबरायचे. मग मी उपहासात्मक पद्धतीने माकडांना संबोधून एक भाषण दिले. " मेरे प्यारे  माकड और माकडियो मेरे दोस्त का बूट वापस देदो ". यावर माकडांनी माझ्याकडे रागानी बघितले. आम्हाला कळून चुकले कि ह्या माकडांसमोर आमचे काहीही चालणार नाही. मग राहुल म्हणाला, बिना बूटाचा पण तो गड चढू शकतो. यावर आम्ही सर्व जण राहुलला " तूच खरा मावळा "  बोलत संजीवनी माची कडे मार्गक्रमण केले. दोन तासांनी संजीवनी माची वर आम्ही सर्व जण पोहचलो. (माची हा किल्ल्याच्या बांधणीतला अत्यंत महत्त्वाचा घटक. ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माच्याही अधिक असतात. असे गड जास्त सुरक्षित असतात. माची म्हणजे गडावरील तटांनी सुरक्षित केलेली जागा. माचीवर शिबंदी असते. माची त्या भागाचे संरक्षण करते. राजगडावर संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची अशी तीन माच्या आहेत. - Wikipedia) संजीवनी माची ही खरोखरच खूप भक्कम आहे आणि एवढ्या वर्षानंतर सुद्धा हि जागा जशीच्या तशी आहे. संजीवनी माचीला एकूण १९ बुरूज आहेत संजीवनी माचीवर असलेल्या चिलखती बुरुजावर आम्ही सर्वानी फोटोशूट केले. माचीवर आम्हाला सर्वाना एक भुयार दिसले. त्या भुयारातून खूप जोर जोरात थंड हवा येत होती. ते बघण्यासाठी आम्ही घाबरत घाबरत भुयारामध्ये प्रवेश केला. पुढे गेल्यावर ते भुयार एका बुरुजाला जाऊन भेटत होते. त्या बुरुजावरील थंड हवा भुयारामध्ये आत येत होती. खरंच त्या काळाचे वास्तुशास्त्र खूपच छान होते. संजीवनी माची बघून झाल्यावर आम्ही सर्वाना ओढ लागली बालेकिल्ल्याची. बालेकिल्ल्यावर जाणारा दगडी मार्ग हा मार्ग खरोखरच अत्यंत कठीण व अरुंद आहे.  पण सध्याच्या काळात चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी लोखंडी सळ्या लावलेल्या आहेत. त्या सळ्या पकडून चढतांना आणि उतरताना खूप भीती वाटते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्या काळी आपले महाराज आणि मावळे अशा भयानक खडकांमधून चढून वर कसे गेले असतील. आम्ही सर्वजण वर चढत असताना साद दयाचो " जय भवानी जय शिवाजी" , " हर हर महादेव ". महाराजांचे नाव घेत घेत पुढच्या एका तासात आम्ही बालेकिल्ल्यावर पोहोचलो. बालेकिल्ल्यावर तुफान वारा वाहत होती. त्या वाऱ्याला बेभान अश्या पावसाची उत्तम साथ लाभली होती. त्यामुळे आम्हाला समोरचे काहीच दिसत नव्हते. असे वाटत होते कि त्या वाऱ्याने आम्हाला खाली पडायचे ठरवले आहे. पण त्या परिस्थितीत सुध्दा आम्ही बालेकिल्यावरील प्रत्येक ठिकाण बघितले. बालेकिल्ल्यावरचा राजवाडा, सदर, अर्धचंद्रकार तलाव, महादरवाजा, ब्रम्हेश्वर मंदिर, जननी मातेचे मंदिर ह्या पुरातन वास्तू खरोखरच बघण्यासारखे आहेत. खरच छाती भरुन येते जेव्हा मनात विचार येतो कि ह्या जागेवर महाराजांनी कधीतरी वास्तव केले होते. ह्या स्वर्गाहून सुंदर अश्या जागेची किंमत हजारो रुपयांत पण मोजता येणार नाही. त्या सर्व आठवणी आम्ही आमच्या डोळ्यात ठेवल्या आणि परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात पण खूप पाऊस लागला. बालेकिल्ल्यावरून परत येताना सहजच आमचा विषय आरोग्यवर गेला. मग आमचे मित्र राहुल कोंढाळकरने राहुल तांगडे आणि अजित यांना शरीर भक्कम करण्यासाठी काही महत्पूर्ण सूचना देण्यात आल्या. तुम्ही हे खा किंवा हे प्या. वगैरे  वगैरे... त्या नंतर समाधानकडून अतिशला (म्हणजेच मला) वजन कमी करण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या. बघू त्या सूचनांचं पालन कोण कोण करतय ते. बोलण्या बोलण्यात आम्ही पद्मावती मंदिरात पोहचलो. आम्ही लगेच मंदिरातल्या दादांना चहा आणि कांदा भजी करण्यास सांगितले. कांदाभजी तयार करण्याचा तो सुगंध पूर्ण मंदिरात दरवळला. थोड्याच वेळात त्या दादाने कांदा भजी दिले. एवढ्या मोठ्या पावसात ती खमंग भजी खातांना वेगळीच मजा आली. आणि त्या नंतर तो मसालेदार चहा. वा...वा...आयुष्य असावे तर असे. त्या दादांना जेवणाचे, भजी आणि चहाचे पैसे देऊन आम्ही मंदिरातून निघालो. माकडांनी चोरलेला राहुलचा एक बूट चुकून भेटतोय का ह्या विचारांनी आम्ही सर्वजण परत एकदा बूट शोधू लागलो. दहा-पंधरा मिनिट्स ने आम्ही आमची शोधमोहीम बंद केली. पण त्या नंतर एक खूपच मजेशीर गोष्ट घडली. राहुलने त्याच्या जवळ असलेला एक बूट बॅग ला बांधला. आणि पुढे चालू लागला. मला कळलेच नाही राहुल त्या एका बुटाचे घरी जाऊन करणार तरी काय? तर राहुल म्हणाला कि मी हिवाळ्यात परत येईल तेव्हा ते माकडे माझा दुसरा बूट परत देतील. आम्ही सर्वानी हसत हसत गडाच्या पायथ्यापाशी पोहचण्यास सुरवात केली. तीन तासांनी आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.
       परतीच्या प्रवासात आम्ही राहुल कोंढाळकर च्या घरी गेलो. त्याचे घर पण खूप भारी होते. तीन-चार डोंगरांच्या मध्ये त्यांचे गाव वसलेले. घराच्या समोरच तलाव. तलावाच्या आजू बाजूला भातशेती. घरच्या मागच्या बाजूस पालेभाज्या लावलेल्या. अश्या ह्या वातावरणात मन कधी रमते कळतच नाही. आम्ही सर्वजण त्या तलावात उतरलो. दिवसभरचा थकवा त्या तलावाच्या शीतल पाण्यामुळे निघून गेला. कपडे बदलून राहुलच्या घरी जाताच राहुलच्या आई ने मस्स्त पैकी उपमा केला होता. मावशींनी उपमा नंतर चहा ठेवला. चहा घेऊन आम्ही सर्व जण गाडीत बसलो. संध्याकाळचे सहा वाजले होते. आता खरी कसोटी होती अजितची. कारण अजित गाडी चालवत होता. त्या अंधाऱ्या रात्री खूप पाऊस पडत होता. घाटातून जाताना धुके पण होते. रस्ता पण अरुंद होता त्यामुळे प्रत्येक वळणावर भीती वाटत होती. पण अजितने अजिबात न घाबरता एकदम व्यवस्थित गाडी चालवली. घाट उतरल्यावर आम्ही एका हॉटेल मध्ये थांबून रात्रीचे जेवण करून घेतले. सर्व मुलांनी गाडीमध्ये उरलेल्या वेळेत कालच्या आणि दिवसभर च्या दिवसाबद्दल बोलण्यास सुरुवात केली. सगळे जरी खूप थकले होते पण तरीही सगळ्यांच्या चेहऱ्यावर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजगड किल्ला सर केल्याचा आनंद दिसत होता. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी राजगडचे सौंदर्यवैभव डोळ्यात घेऊन घरी आलो.
      सर्वात शेवटी, वर उल्लेख केल्याप्रमाणे मला सांगितलेले एक काम तर तुम्हाला सांगायचेच राहिले. त्यांनी सर्वानी मला ह्या दोन दिवसात जगलेल्या आणि डोळ्यांमध्ये साठवलेल्या अविस्मरणीय क्षणांचे शब्दांमध्ये रूपांतर करायला सांगितले. आणि ते माझे काम आत्ताच पूर्ण झाले आहे.
"शिवाजी महाराज कि जय".....!!!!!