Showing posts with label evening. Show all posts
Showing posts with label evening. Show all posts

Saturday, February 15, 2020

एक रम्य संध्याकाळ

   एक रम्य संध्याकाळ

अरे वा किती छान! आयुष्याचा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आजच्या दिवसासारखा असावा असे वाटते. मला नेहमीच असे वाटायचे कि कधीतरी असा एक दिवस असा असावा कि ज्यामध्ये आपणच आपल्या विश्वात रमून जावे. आजची संध्याकाळ काहीशी अशीच आहे माझ्यासाठी. खरंतर काहीच नवीन नाहिये आजच्या संध्याकाळी मध्ये पण तरीही एक वेगळीच नशा आहे या हवेमध्ये. मंदपणे अंगाला स्पर्श करून जाणारा गारवा पाऊस पडत नसताना पावसात भिजण्याची मजा देतो. मोबाईल मध्ये ऐकत असलेलं पाडगावकारांचे "या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे" हे गाणं स्वर्गप्राप्ती देते. किनाऱ्यावरील तो गरम चहाचा घोट मित्रांची आठवण करून देतो. हृदयात कोणीही नाही हे हृदयाला चांगलेच माहीत असते पण तरीही सारे विश्व सामावून घ्यायची हृदयाची तयारी असते. दिवसभर तापदायक वाटणारा सूर्य संध्याकाळी हवाहवासा वाटतो. समुद्राच्या उंच लाटा आणि जोरदार वाहणारा वारा बघितल्यावर दोघांची किनाऱ्यावर पोहचण्यासाठीची धडपड लक्षात येते. सूर्यास्तावेळी घरट्याकडे परतणार्‍या पक्ष्यांचे सुंदर थवे बघून मन खूपच आनंदी होते. अशावेळी बालभारतीच्या मुखपृष्टा ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. समोरच्या लाटांमध्ये उभे राहून मज्जा घेणारी ती सुंदर तरुणी हळूच लक्ष वेधून घेते. क्षणापूर्वी दिसलेली ती अनोळखी तरुणी जणु काही आपली प्रेयसी असल्याचा भास होतो. तो अद्भुरम्य क्षण अपूर्ण गोष्ट पूर्ण झाल्याचा आनंद देऊन जातो. सर्वात शेवटी असे वाटते कि, दिवस आणि रात्र यांच्या  या संगमामध्ये तुकडे-तुकडे व्हावेत आपल्या या नश्वर देहाचे आणि या थंडगार हवेत विरून जावेत.      

                                                      - Atish Ghonge