Showing posts with label marati. Show all posts
Showing posts with label marati. Show all posts

Sunday, October 18, 2020

झाडाखाली असलेले थंडगार मातीचं मडकं

               
               रणरणत्या उन्हाने तापलेल्या रस्त्यावरून चालता चालता खूप तहान लागली म्हणून मी इकडे तिकडे बघितले. कोण्यातरी सज्जन माणसाने एका झाडाखाली मातीचं मडकं ठेवले होते. मी  ताबडतोब त्या झाडाखाली जाऊन माठातील थंडगार पाण्याने स्वतःची तहान भागवली आणि सहज विश्रांती घेण्यासाठी झाडाखाली बसलो. डोके निवांत झाडाच्या मुळांवर ठेऊन विश्रांती घेता घेता सहज मनात विचार आला. काय जीवन आहे ह्या माठाचे. निवांत आहे एका ठिकाणी. पाणी पण दुसरंच भरतंय. साफ सफाई पण कोणी तरी करत असणार. हा पठ्या बसलाय थंडगार झाडाखाली आराम करत. 
               तेवढ्यात काहीतरी विचित्र घडले. त्या मातीच्या माठातून आवाज आला. मी घाबरून बघितले. माठ चक्क बोलत होते. अहो तुम्हाला वाटतेय तसे काही नाही आहे. काही वर्षांपूर्वी निवांत मातीच्या रुपात जमिनीवर पडलो होतो. सर्व काही सुरळत चालू होते पण अचानक काही लोकांच्या समूहाने कुदळीने घाव घालण्यास सुरुवात केली. मला काहीच कळत नव्हते मी काय बिघडवले कोणाचे. त्या नंतर सुद्धा त्यांनी मला त्रास देने चालूच ठेवले. चाळणीने चाळून चाळून शरीराचे बारीक तुकडे केले. मग पाणी टाकून थंडगार केले. त्यानंतर अक्षरशः पायाने तुड तुड तुडवले. नंतर हाताने गोळा करून काहीतरी बनवले. मला वाटले आता तरी यांचे झाले असेल. पण नियतीला काहीतरी दुसरेच मान्य होते. मला काही कळायच्या अगोदर त्या सर्वांनी काहीही विचार न करता निखाऱ्यांनी तापलेल्या भट्टी मध्ये टाकले. शरीराचे पाणी पाणी झाले. खूप ओरडलो मी. कोणीही नव्हते तिकडे माझा आवाज ऐकायला. माझं दुःख समजून घायला. मग मी अग्नी देवतेला  आवाहन केले की देवा तू तरी तुझा प्रकोप कमी कर. मग भाजला जातोय. तेव्हा अग्नीदेव म्हणले की बेटा आयुष्यात जर काही बनायचे असेल तर त्रास सहन करायला लागेलच. प्रत्येक कसोटी पार करून जायला लागेल. ह्या नंतर तुझे आयुष्य बदलून जाईल बघ. फक्त थोडा वेळ सहन कर. मधेच प्राण सोडू नकोस नाहीतर फुटून जशील. तुला कोणी ही लक्षात ठेवणार नाही. मग मी देवाला म्हणलो चालेल देवा सहन करतो हा त्रास. अश्या प्रकारे मी त्रास सहन करत गेलो. काही वेळाने अग्नी देवाचा दाह कमी झाला. त्या माणसांनी मला त्या भट्टीमधून बाहेर काढले. 
               दुसऱ्या दिवशी मला एका वेगळ्या प्रकारच्या रंगाने रंगवून घरच्या एका कोपऱ्यात ठेवले. एवढा सर्व त्रास सहन केल्यावर मला कुठे ही बघायची इच्छा होत नव्हती म्हणून मी माझे डोळे बंद करून बसलो होतो. तेवढ्यात एक आवाज आला. अरे वा किती छान दिसतोयस तू. मी म्हणालो की नक्कीच चांगला भाजला गेलोय त्यामुळे कोणी तरी माझी चेष्टा करतंय. पण ह्या वेळेस आवाज थोडा जास्त मृदू होता. अरे डोळे उघडून बघ तर स्वतःकडे. मग मी न राहून डोळे उघडले. समोर आरसा होता आणि  त्या आरश्यामध्ये कोणी तरी लाल रंगाने सजवलेले एक मोठे भांडे होते. आरसा म्हणले अरे वेड्या दुसरे कोणी नाही तूच आहेस. तू एवढे सर्व सहन केलेस त्यामुळे तुझे रूप बदलले गेले आहे. मी खूप खुश झालो. आरश्याला माझे नवीन रूप दाखवल्या बद्दल धन्यवाद बोललो. 
               तरी पण बरेच दिवस एकाच ठिकाणी पडून होतो म्हणून पुन्हा एकदा नाराज झालो. काही दिवसांनी त्या माणसांनी मला बाजारात नेले. तिकडे गेल्यावर कोण्या एका सज्जन माणसाने पैसे देऊन मला विकत घेतले. त्या दिवशी एक गोष्ट समजली की जो पर्यंत मी जमिनीवर निवांत पडून होतो तो पर्यंत लोकांच्या पायाची धूळ होतो. एवढा सर्व त्रास सहन केला. प्रत्येक परिस्थितीला सामोरे गेलो व जिद्दीने लढलो म्हणून पायाखालच्या त्या मातीचं रूपांतर एका सुंदर मडक्यात झाले. एवढ्या सर्व यातना सहन करून मी आज येथे तुमच्या सामोर उभा आहे. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाटसरूंची थंड पाण्याने तहान भागवतो. त्रास सहन केला म्हणून आज माझ्या आयुष्याला उद्देश आहे. मित्रा तू पण खूप मेहनत कर. त्रास सहन कर. तू तुझ्या उद्देश्यापर्यंत नक्कीच पोहचशील. मी त्या माठाचे शांतपने ऐकले आणि हो म्हणालो. तेवढयात माझ्या डोक्याला काहीतरी लागले. ताडकन मी उठून बसलो तेव्हा कळले मी गाढ झोपेत गेलो होतो. आणि माझ्या स्वप्नात बोलत होता. तेवढ्यात एक माणूस तिथे आला आणि त्या माठातून थंडगार पाणी प्यायला. 
               अश्या प्रकारे एका निर्जीव वस्तूने सजीव वस्तूला आयुष्यचा धडा दिला. तिथून जाता जाता मी त्या थंडगार माठाला हाथ लावला आणि मनातल्या मनात स्मित हास्य करून त्याला धन्यवाद बोललो आणि आपल्या मार्गाला लागलो. 

- अतिश घोंगे